साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कादंबरीविश्व (लेख)
पारंपरिक धार्मिक मूल्यांना छेद देणारे ‘ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरली आहे. त्या दलितांचं जीवन तितक्याच प्रामाणिक हेतूनं नि निष्ठेनं मी चित्रित करणार आहे नि करीत आहे.’ हे ऐतिहासिक विधान नोंदवून जगाकडे डोळस, वास्तववादी दृष्टिकोनातून बघण्याची शिकवण देणाऱ्या व आपल्या वरील विधानाप्रमाणे दलित-शोषित कष्टकरी चळवळीसोबत एकनिष्ठेनं राहणाऱ्या लोकशाहीर, साहित्यिक कॉम्रेड अण्णाभाऊ हे कामगार-कष्टकऱ्यांच्या चळवळीचे लोकशाहीर म्हणून अधिक नावाजले. तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी कुरुंदवाड संस्थानातील वाटेगाव ता.वाळवा, जि. सांगली येथे झाला. गावाच्या बाहेरील वस्तीतील एका छपरात अण्णांचा जन्म झाला. अण्णाची आई वालुबाई भाऊराव साठे आणि घरातील मोठे लोक दोर वळण्याच्या कामाला जात. त्यांचे वडील भाऊराव सिद्धोजी साठे पोटापाण्यासाठीच मुंबईत राहत असत. त्यामुळे लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तुकारामांवर (अण्णांचे मूळ नाव) म्हणजेच अण्णाभाऊंवर होती. तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या. अण्णाभाऊ पहिल्यांदा वाटेगावच्या शाळेची पायरी चढले; पण शिक्षकांच्या निर्दयी मारामुळे दोन दिवसांतच त्यांनी शाळेचा धसका घेऊन शाळेकडे कायमचीच पाठ फिरवली. रेठर्याच्या जत्रेत अण्णांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले आणि अण्णांभाऊंना स्वातंत्र्य चळवळीत उतरण्याची प्रेरणा देऊन गेलं. वयाच्या ११ व्या वर्षी अण्णा आपल्या आई-वडिलांबरोबर मुंबईत आले. हे कुटुंब भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत राहायला गेले. मुंबईतली सुरुवातीची वर्षं ही अण्णाभाऊंसाठी वैचारिक जडणघडणीची ठरली. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डवरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले. या अक्षर ओळखीनंतरच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली. क्रांतिकारक विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने ते जेव्हा मुंबईच्या ‘माटुंगा लेबर कॅम्प’ या दलित-शोषितांच्या वस्तीत कम्युनिस्ट चळवळीत कार्य करू लागले तेव्हा विकसित झाला. 'कार्यकर्ते लेखक' असं अण्णाभाऊंना म्हटलं गेलं, कारण आपल्या साहित्याला त्यांनी सामाजिक चळवळींशी जोडलं. सामान्य कष्टकरी लोकांशी असलेली त्यांची बांधिलकी त्यांच्या साहित्यातून आणि कार्यातून दिसते. याच लेबर कॅम्पमध्ये ते पुन्हा धुळाक्षरे गिरवू लागले व लिहावयास लागले. त्यांनी पहिले गाणे लेबर कॅम्पमधील मच्छरावर लिहिले. याच लेबर कॅम्पमध्ये कॉ. अण्णा भाऊ साठे, शाहीर कॉ. अमर शेख व शाहीर कॉ. द. ना. गव्हाणकर या त्रयींनी कम्युनिस्ट पक्षाच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक ‘लाल बावटा’ कलापथकाची १९४४ साली स्थापना केली. आणि क्रांतिकारक शाहिरीचा बुलंद आवाज महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर पसरला. अण्णा भाऊंसारखा लेखक प्रारंभी कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रांमधूनच वार्ताहर, कथाकार, गीतकार म्हणून लेखन करू लागला.
महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित अण्णाभाऊ साठे यांनी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही ताकदीने हाताळले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिलं जातं. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे. अण्णांनी वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, फकिरा अशा अनेक कादंबर्या लिहिल्या. ३०० च्या वर कथा लिहिल्या. खुळंवाडी, बरबाह्या कंजारी, कृष्णाकाठच्या कथा असे त्यांचे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्टॉलीनग्राडचा पोवडा, महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा कामगार असे पोवाडेही लिहिले. निवडणुकीत घोटाळे, दुष्काळात तेरावा, अकलेची गोष्ट ही त्यांची वगनाट्ये प्रसिद्ध आहेत. दोनशे-अडीचशे गाणी, लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत. कामगारांमध्ये त्यांची गाणी आणि लावण्या लोकप्रिय आहेत. शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर आणि अण्णाभाऊ साठे या तिघांनी १९४१, १९४२ मुंबई शहरावर अधिराज्य गाजविले. याच काळात बंगालमध्ये दुष्काळ पडला होता. त्यावर अण्णांनी ‘बंगालची हाक’ हा पोवाडा रचला. संयुक्त महाराष्ट्रलढ्यात त्यांनी कामगार जागा करुन त्यांची एकजूट संघटना निर्माण केली. अण्णा भाऊंचे साहित्य इंग्रजी, रशियन, फ्रेंच, झेक आदी जागतिक भाषांतही अनुवादित झाले. मराठीतील ज्येष्ठ साहित्यक व दलित साहित्याचे प्रवर्तक बाबुराव बागूल यांनी अण्णा भाऊंची तुलना सुप्रसिद्ध रशियन साहित्यिक ‘मॅक्झिम गॉर्की’ यांच्याशी केली आणि 'महाराष्ट्राचा मॅक्झिम गॉर्की' असा गौरव केला.
अण्णांच्या १२ कथांवर चित्रपट निघाले. एवढे साहित्य प्रसिद्ध झाले तरी त्यांचे दारिद्रय संपले नाही. लक्ष्मी त्यांना प्रसन्न नव्हती. ते मितभाषी असल्याने व्यावहारिक बाबतीत लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला. परंतु चित्रपट सृष्टीतील भालजी पेंढारकर, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, सुलोचना यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अण्णांवर खूप प्रेम केले. हिंदी चित्रपट सृष्टीतीलही राजकपूर, शंकर, शैलेंद्र, बलराज सहानी, गुरुदत्त, उत्पल दत्त या कलाकारांचे अण्णांवर प्रेम होते. ऑलेगसारखे रशियन कलावंतही अण्णाभाऊंचे मित्र होते. चौदा लोकनाट्यं, 'वारणेचा वाघ', 'वैजयंता', 'फकिरा', 'चित्रा' इत्यादी प्रचंड गाजलेल्या कादंबर्यांसहित सुमारे बत्तीस कादंबर्या आणि बावीस कथासंग्रह अशी विपुल साहित्यनिर्मिती त्यांनी केली. अण्णाच्या अनेक कादंबर्यांनी त्या काळी मराठी चित्रपटसृष्टीला कथांची रसद पुरवली. 'वैजयंता', 'टिळा लावते मी रक्ताचा', 'डोंगरची मैना', 'वारणेचा वाघ', 'फकिरा', आदी प्रसिद्ध चित्रपट त्यांच्या कथा-कादंबर्यांवर आधारित आहेत. त्यांच्या लोकनाट्यांमध्ये 'अकलेची गोष्ट', 'कलंत्री', 'बेकायदेशीर', 'शेटजीचं इलेक्शन', 'पुढारी मिळाला', 'मूक मिरवणूक', 'देशभक्त घोटाळे', 'लोकमंत्र्यांचा दौरा' इत्यादींचा समावेश आहे. १९४९ साली अण्णाभाऊंनी `मशाल’ साप्ताहिकात `माझी दिवाळी` नावाची पहिली कथा लिहिली. तिथून त्यांचा साहित्य प्रवास सुरु झाला. जगण्यासाठी लढणार्या माणसांच्या अण्णांभाऊंच्या कथा आहेत. ४५ कादंबर्या, १५० कथा, तीन नाटके, ११ लोकनाट्ये, ७ चित्रपटकथा व असंख्य लावणी पोवाडे असे त्यांचे साहित्य प्रसिध्द झाले
ना.सी. फडके आणि वि.स. खांडेकर यांचा प्रभाव असणाऱ्या मराठी कादंबरीच्या त्या काळात जेव्हा शहरी आणि उच्चवर्गीयांचंच प्रतिनिधित्व होत होतं, तेव्हा अण्णाभाऊंनी कनिष्ठ आणि ग्रामीण जनतेचं विश्व साहित्यात आणलं. अण्णाभाऊंच्या साहित्यात ग्रामीण, दलित, महिला या समाजातल्या शोषित वर्गांचं अनुभवाधिष्ठित चित्रण आढळतं. साहस या गुणाचं चित्रण त्यांच्या अनेक कादंबऱ्यांतून आढळतं. ‘फकिरा’ या त्यांच्या सर्वाधिक प्रसिद्ध कादंबरीत त्यांनी आपले खऱ्या आयुष्यातले मामा फकिरा राणोजी मांग यांची साहसी जीवनकथा मांडलेली आहे, फकीरा ही पुढे अतिशय गाजलेली कादंबरी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली. तर ‘वारणेच्या खोऱ्यात' या कादंबरीत स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करणारा तरुण आणि त्याच्या प्रेयसीची कथा आहे. मराठीतील ग्रामीण, प्रादेशिक, दलित साहित्यावर अण्णाभाऊंचे प्रभुत्व होते. अण्णाभाऊंच्या साहित्याचे हिंदी, सिंधी, गुजराती, उडिया, बंगाली, तमिळ, मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलीश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमधे भाषांतर झाले आहे. लेखणीचे हत्यार बनवून त्यांनी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ, स्त्रीवादी, लढाऊ अविष्काराचा दीपस्तंभ मराठी साहित्याच्या क्षेत्रात उभा केला. पु.लं. देशपांडे यांनी त्यांचे ‘तीन पैशाचा तमाशा’ हे नाटक अण्णाभाऊंना समर्पित केले होते. एवढ्या मोठ्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रसिद्धी मिळत होती.
वारणेच्या खोऱ्यात साहसाचे चित्रण करणारी ही कादंबरी आहे. या कादंबरीतील नायक देखना असून त्याच्याकडे वास्तवादी जीवनदृष्टी आहे. वारणा खोऱ्यातील प्रतिसरकार स्थापन करणाऱ्या हिंदुरावाची कथा या कादंबरीत चित्रित झाली आहे. यातील ,व्यक्तिरेखा, शक्तिमान, नीतिमान, स्वतंत्राकांची, देशप्रेमी व त्यागी आहे. क्रांतिकारी हिंदुरावांनी तरुणांच्या चळवळ उभारून सरंजामशाही वृत्तीच्या विरूध्द बंड पुकारले आहे. वारणेच्या खोर्यात मूळचा शेतकरी असलेल्या हिंदुरावाला बंडखोर आणि शोषित लोकांना अन्यायाविरुद्ध लढणारा आणि शोषित लोकांना त्यांचे हक्क प्राप्त करून देणारा नायक म्हणून अण्णाभाऊंनी अतिशय ताकतीने त्यांचे विश्व उभे केलेले आहे.
पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रिया कशा विकल्या जातात. तरीही भारतीय स्त्री आपले शील कसे जपते, याचे चित्रण ‘चित्रा’ या सुंदर तरुणीच्या सत्य कथेतून अण्णाभाऊंनी चित्रित केलेले आहे. वेश्याव्यवसायातील स्वतःची सुटका करुन घेणारी चारित्र्यसंपन्न चित्रा ही या कादंबरीची नायिका. ही कादंबरी नैतिकतेच्या मूल्यंभोवती फिरताना दिसते. खरं तर स्त्रीला स्त्रीच ओझं वाटते. घरात कोणी करता माणूस नसल्यामुळे मुलीची अभ्रू मातीत मिसळेल अशी धास्ती घेणारी चित्राची आई सखुबाई. आपले कर्तव्य बजावत काहीही करून ‘अब्रू सांभाळा’ अशी ती सल्ला देते. आणि चित्रा आयुष्यभर जीवाच्या मोलाने अभ्रू जपते. कादंबरी सुरुवातीलाच अण्णाभाऊ म्हणतात, “ही सत्यकथा वाटेगाव येथे राहून सातारा जिल्ह्यात भटकत होतो. त्यावेळी कराड कोल्हापुरात एक भाची व एक मामा अशी दोन माणसे भेटली. यातून प्रत्यक्ष ऐकलेल्या कथेवर चित्रा कादंबरीची मांडणी केलेली आहे. वास्तव व प्रमाणीकरण हे या कादंबरीचे खास वैशिष्ट्य होते.
फकीरा कादंबरीच्या प्रस्तावनेत लेखक अण्णाभाऊ साठे म्हणतात “फकीरा जरी उपेक्षित होता. तरी तो मला परका नव्हता. तो माझा होता. त्याचे कर्तृत्व पाहून मी ही कादंबरी लिहिली आहे.” फकीरा ग्रामपातळीवरील संघर्षाची कथा म्हणून महत्त्वाची आहे. गावाला समृद्धी मिळावी यासाठी या कादंबरीतील नायक संघर्ष करतो. या कादंबरीतुन अण्णाभाऊ जसे गावाच्या समृद्धीचा विचार मांडतात तसे जाती व्यवस्थेतील तणावही व्यक्त करतात. फकिराच्या पराक्रमाची गाथा या कादंबरीतून मांडतात. सामाजिक व सांस्कृतिक पातळीवर संघर्षाचे धागेदोरे या कादंबरीत गुंतलेले दिसतात. मानवतेचा उद्घोष करणाऱ्या काही कलाकृती पहावयास मिळतात. त्यापैकी फकीरा ही मानवतावाद दर्शवणारी कादंबरी आहे. आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेली ही कादंबरी बाबासाहेबांच्या विचारांचे दर्शन घडवते. अस्पृश्यांच्या वाट्याला आलेली अवहेलना, गुलामी, अपमान त्या विरुद्ध बंड करून पेटून उठणारा महानायक ‘फकीरा’ या कादंबरीत पहावयास मिळतो. मानव मुक्तीचे भान ठेवणारा, सहकाऱ्यांना सोबत घेऊन स्वाभिमानाने पराक्रमाने लढणारा फकीरा, क्रांती प्रवण तरुणांच्या समोर आदर्श ठरतो. मानवी स्वातंत्र्याचा आणि प्रतिष्ठेचा उद्घोष करणारी फकीरा ही विलक्षण कादंबरी आहे. फकीरा हाच या कादंबरीचा मुख्य नायक आहे. दुष्काळ रोगाच्या साथी व उपासमार यात अडकलेल्या महार, मांग, रामोशी, समाजाला जगविण्यासाठी धान्याचे गोदाम आणि ब्रिटिशांचे खजिने लुटून गोरगरिबांना धान्य पसा पसा वाटतो. या कादंबरीचा नायक तरुणांपुढील आदर्श ठेवणारा आहे. दलित, पीडित समाजाची होणारी उपासमार फकिराला अस्वस्थ करते खरंतर लेखकाची अस्वस्थता या कादंबरीतून स्पष्ट दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे.
‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. वैजयंता ही तमासगीर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी अतिशय महत्त्वाची कादंबरी आहे. यात तमाशा कलावंत असलेल्या स्त्रीच्या प्रश्नांची उकल केलेली आहे. ‘वैजयंता’ ही त्या कादंबरीची नायिका अप्रतिम सौंदर्य असलेली, हुशार, तेजस्वी व्यक्तिमत्त्वाची जन्माबरोबर बारा दिवसाची असल्यापासूनटी आईच्या पायातील घुंगराचा ताल, ठेका ऐकत असते. त्याच नादावर खेळत असते. आपला बाप कोण याची जाणीवही तिला नाही. पण आपल्या समवयस्क उमा या तरुणाबरोबर आपले भावविश्व कळत नकळत गुंतत जाते. आईच्या उतारवयात प्रेक्षकांना ती रिझवू शकत नाही. यावेली चंद्रा नर्तकी तिचा अपमान करते या अपमानाचा सूड घेण्यासाठी तिची आई गजराबाई वैजंतीला एक दिवसाकरीता तमाशाच्या फडात नाचायला उभी करते. आणि हीच तिच्या आयुष्य उध्वस्त होण्याची नांदी ठरते. कामांध लोक तिला आपली करण्यासाठी धडपडतात. तमाशा थेटरवाले तिच्या मागे भुंग्यासारखे लागतात. वैजंताच्या सौंदर्याचे लचके तोडण्यासाठी अनेक लोक घिरट्या घालतात. म्हणून जीवापाड प्रेम करणारी वैजयंता आपल्या प्रेमाशी प्रामाणिक राहते. आजारी आई, पोटात भडकलेली भुक, विजलेली चूल आणि कहर म्हणजे देहाचे लचके तोडणाऱ्या कामांध नजरा हे कलावंताचे जीवनविश्व वाचकाला अस्वस्थ करते
चंदन ही कामगार वस्तीत वाढलेली स्त्री त्यांनी या कादंबरीत कामगार स्त्रीचे जीवन चित्र रेखाटले आहे. ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करणारी विधवा स्त्री चंदन. ती प्रामाणिकपणे आपल्या कष्टावर जगते. शिक्षणाचे महत्त्व जाणून मुलांना शिकवते. पण तिची आब्रू लुटण्यासाठी वखवखलेल्या नजरा तिला घायाळ करतात. तेव्हा दयाराम हा पुरुष तिच्यावर अन्याय करतो. तिचे शोषण करून शारीरिक छळ करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ती चवताळून उठते. चंदन कष्टाळू स्त्रीची कथा पण कामगार जातीतील स्त्री व्यवस्था, होऊन बसते. मुंबईत जगायला आलेल्या चंदनाच्या नवऱ्याचा अपघाती मृत्यू होतो. झोपडपट्टीत वास्तव्य असते त्यामुळे झोपडपट्टीतल्या वास्तवाचे चित्रण करण्यात आणा भाऊ वास्तवदर्शीपणा दिसतो. स्त्री प्रश्नाविषयी अण्णाभाऊंनी ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्यामधे चंदन ही महत्त्वाची कादंबरी होय. स्त्री प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांची ही कादंबरी तत्कालीन मराठी साहित्यविश्वात महत्वाची ठरते.
पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत अण्णाभाऊ आवड़ी कादंबरीची निर्मिती सूत्र ते सांगताना ते म्हणतात “माझी माणसं मला कुठे ना कुठे भेटलेली असतात. त्यांचं जगणं मरणं मला ठावूक असतात. मग मी कल्पनेने त्याच्याशी एकरूप होतो. आवडीचं प्रेत गोरीतुंन काढले तेव्हा मी गोरीजवळ हजर होतो. प्रचंड देहाचा धनाची काखेत लुगडे चोळी घेऊन रडत होता. त्याला आवडीची एक चेपली मिळाली तेव्हा तो लहान मुलाप्रमाणे रडू लागला. त्या प्रसंगाचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला आवडीच जीवन माझ्या प्रतिभेत एक रूप झालो. तब्बल चार वर्षे मी विचार केला. सर्व पदर हाती आल्यानंतरच मी ही आवडी निर्माण केली” आवडी ही नायिकाप्रधान कादंबरी होय. संपूर्ण कादंबरीचे कथानक आवडी भोवती गुंफले जाते. घरंदाज कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या हेकेखोर धोरणामुळे घरातील सुंदर सालस मुलींच्या जीवनस्वप्नांचा चुराडा कसा होतो. याचे मन हेलावून सोडणारे चित्र आवडीतून चित्रित जाली आहे. घरंदाज स्त्रियांना स्वतःचे मतही व्यक्त करता येत नाही. तसा तिला अधिकार नाही, अशी ही समाजव्यवस्था पण व्यवस्थेच्या विरोधात कुटुंबातील कर्त्या पुरुषांच्या विरोधात बंड करणारी नायिका आवडी होय. स्वतःवर होणाऱ्या आन्यायाला मुकाट्याने सहन करावे हे तिला पटत नाही. म्हणून स्वतःचे व्यक्तीमत्व जपणारी आवडी आपल्या सुखासाठी वंचित झालेली आहे. सुख मिळत नाही याची जाणीव झालेली आवड़ी कासावीस होते. आणि धनाजी सारख्या तरुणाची भेट झाल्याने “मला तुमच्या सारखे जगायचं” म्हणून थोड्याच दिवसात बंडखोर होते. धनाजीवर प्रेम करणारी आवड़ी समाजाला रुचत नाही. म्हणून होणाऱ्या कोणत्याही छळाला आवडी सामोरे जाते.
“माकडीचा माळ” ही कादंबरी भटक्या-विमुक्त जीवनाचे चित्रण करणारी वास्तवदर्शी कादंबरी म्हणून ओळखली जाते. या कादंबरीत माणसापेक्षा ही पशू पक्षात माणुसकी अधिक दिसते, असे चित्र उभे राहते. तशी ही भटक्या जमातीत जीवन जगणाऱ्या यंकू माकडवाला त्याच्या कुटुंबाची कथा होय. या कादंबरीचे नजरेत भरणारे वैशिष्ट्य म्हणजे सुगीच्या दिवसात गावाच्या बाहेर पाल ठोकून राहणाऱ्या फिरत्या जमातीच्या जगण्याचे चित्र आहे. असे चित्र मराठीत कादंबरीत पहिल्यांदाच आलेले आहे. भटक्या जमातीच्या जीवन दर्शनातून भयानक संघर्षमय जीवन जगणाऱ्या यंकू माकडवाला आणि त्याची मुलगी दुर्गा यांच्यावर बेतलेला प्रसंगानी वाचक अस्वस्थ होतो. तशी ही नीति संपन्न तरुणाची कहाणी होय. यंकू माकडवाल्याच्या दुर्गावर प्रेम करणारा नायक प्रेमाचे पावित्र्य जपतो. यंकू माकडवाला व त्याची मुलगी दुर्गावर जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा यमू त्यांना नि:स्पृहपणे मदत करतो. त्यांच्या पाठीशी उभा राहतो पोटासाठी रानोमाळ भटकणाऱ्या जीवन व्यवहारात यमू आणि दुर्गाची निष्ठापूर्वक अव्वल दर्जाची प्रीती अतिशय संयमाने प्रेमाचे पावित्र्य जपणारी आहे. मुळातच ती प्रेम कहानी वाटत असली तरी भटक्या जमातीत जगणाऱ्या, पालात राहणाऱ्या माकडवाल्याची ही दु:खद कहाणी आहे. या कादंबरीतून केवळ भटक्या जमातीच्या जीवनाचे चित्र नाही तर,भणंग भिकाऱ्यांच्या वस्त्यांमध्ये ही वैराची भावना कशी असते यातील हे यातील स्वभावचित्रणातून रेखाटले आहे. मातब्बर माणसं गावात वैभवशाली जगतात. पैसा, सत्ता,यांनी उन्मत्त होतात. वासना तृप्तीसाठी हैवानही होतात.यंकू माकडवाल्याच्या तारुण्याने मुसमुसलेल्या दुर्गाला ओरबाडू पाहतात. क्षणिक सुखासाठी गरिबांचे आयुष्य उध्वस्त करणार्या दुष्ट प्रवृत्तीचे चित्रण अण्णाभाऊंच्या लेखणीतून उतरलेल्या शिवाय राहत नाही. शेवटी गंगा व रंगी या प्राण्यांमधील प्रमाणीकपणाची वृत्ती माणसातून मात्र हरवत आहे, याचे दुःख ही कादंबरी व्यक्त करते.
‘वैर’ या कादंबरीत अण्णाभाऊ कम्युनिस्ट विचारधारणेत वाढले असल्याने गरीब आणि श्रीमंत ही दरी त्यांना खूपते म्हणून गरीब आणि श्रीमंत यांच्या संघर्षातून वैर कादंबरीची निर्मिती झाली. या कादंबरीच्या कथानकाचा त्यापुढच्या गोपाळराव इमानदार या गोपाळरावांना शह देण्यासाठी मुकिंदा हा प्रतिष्ठित शेतकरी त्यांच्यातील स्वभावाचे चित्रण आले आहे. या वैरामुळे गावातील व्यक्ती-व्यक्तींतील मत्सर, द्वेषभावना,वैर कोणत्या टोकाला जाईल हे सांगता येत नाही. गावातील जमीनदार, इमानदार व त्याना साथ देणारे गरीबांना कसे फसवतात याच्या सांगण्यावरून गावातील घरांना आग लावतो मुकुंदाच्या सुनेला पळवून नेतो. थोडक्यात सरंजामशाही दुष्ट प्रवृत्ती कशा वाढलेल्या होतात. याचे चित्र या कादंबरीतून पहावयास मिळते. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा अंतही वाईट असतो. हे या कादंबरीचे मूलतत्त्व आहे.
अण्णाभाऊंनी प्रेम करणाऱ्याच्या कादंबऱ्या लिहिल्या त्यापैकी “गुलाम” एक कादंबरी. या कादंबरीत वेठबिगारांची समस्या चित्रित झाली आहे. जमीनदार आणि वेठबिगार यांचा संघर्ष या कादंबरीत रेखाटला आहे.गरीब किंवा श्रीमंत पोरं प्रेमाच्या जाळ्यात अडकतात पण त्यांचे प्रेम हे समाजमान्य नसते. समाजवादी समतावादी विचारांच्या अण्णाभाऊंना विषमतेला छेद देऊन समता प्रस्थापित करावयाची आहे. ते त्यांच्या लेखणीची बळ आहे. सदु वेठबिगाराचा मुलगा, वासू हा आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर जमीनदार रावसाहेबांकडे काम करतो. तेव्हा जमीनदाराची मुलगी मीनाक्षी त्यांच्या प्रेमात पडते. परंतु उदार अंत:करणाने मधू नावाच्या मुलीशी त्याचे लग्न लावून वासूची गुलामीतून सुटका करतो अशी ही कथा गुलामच्या रूपाने अण्णाभाऊंनी रेखाटली आहे.
‘अग्निदिव्य’ ही त्यांची ऐतिहासिक कादंबरी. शिवाजीमहाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या कादंबरीतही त्यातल्या नायिकेला त्यांनी महत्त्व प्राप्त करून दिलं आहे.
अण्णा भाऊंच्या साहित्यातील वैविध्य, भाषेवरील पकड पाहिली की कोणीही अचंबित होईल एवढे सामथ्र्य त्यांच्या लेखणीत आहे. वैयक्तिक दु:खांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्य लेखनात अद्भुतता, अतिशयोक्ती, अतार्किकता आहे, पण त्यात तेवढेच नाही; त्यातून जीवनातील विदारक वास्तवही प्रगट झाले आहे. लोककथेतील अद्भुतता, अतिशयोक्ती मानवी मनाला भुरळ घालते. पण त्यातून प्रगट झालेले जीवनातील तत्त्वज्ञान व वास्तवाचे दर्शन त्या मनाला अंतर्मुख करून विचार करायला लावते. रंजन करता करता व्यापक जीवनदर्शन घडविण्याचे सामर्थ्य त्यांच्या साहित्यात आढलते. लोकपरंपरेतील मौखिक साहित्याचे वैशिष्ट्य अण्णाभाऊ साठे यांच्या कथा-कादंबऱ्यांमधून कलात्मक रूप घेऊन आविष्कृत झालेले आहे.
संदर्भ
१ गुरव , बाबुराव , अण्णाभाऊ साठे : समाज विचार आणि साहित्य विवेचन , मुंबई , १९९९ .
२ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ , प्रकाशक , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे : निवडक वाङ्मय , मुंबई.
३ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे : निवडक वाङ्मय ,कादंबरी खंड १
Comments
Post a Comment