आपलेपण

जोरात धडकते अंतःकरण
आपण कोणत्या बाजूला उभे आहोत
हे आपल्या नजरेत आल्यावर
हादरून जातो आपण आपल्या आतूनच
काळाच्या वारूवर बेभान स्वार झालेले आपण
कोणत्या पातळीला घसरून गेलोय
काळ्यामिट अंधाराच्या विशाल पदरात
माणसं भेदरून गेलीत
माणसांच्या खच्चून भरलेल्या गर्दीत
प्रत्येकजण अविश्वासाने पाहतोय स्वतासकट गर्दीकडे
हव्यास भरून उरलाय सभोवताल
आमिषाने बाटवून टाकलंय
आपलेसे केलेय माणसातील स्वार्थाला
ही जगण्याची धरपकड
हवालदिल झालेला माणूस
संशयाने पाहतोय सभोवताल
थरथरत्या अंतकरणाने
कधी आपला नंबर लागेल आणि कधी होईल
कडेलोट याचा अंदाज घेतोय
या सरसावल्या टोळधाडीच्या हल्याचा
घाबरलेल्या तुटलेल्या धडधडणाऱ्या अंतकरणाने
तू सदैव उभा
पाठीराखा असल्यासारखा
माझ्या खऱ्या खोट्याच्या न्यायात
सगळेच व्यवहार तुझ्या साक्षीने बांधलेले भाळावार
माझी नीती माझे डावपेच युध्दणीती सगळे बांधील तुझ्यात
पण सगळे तू करतोस बेदखल
स्वतःचे अंग वाचवून स्वता नवा कोरा राहून

Comments

Popular posts from this blog

सोशल मिडीया वाचक व अभिरुची (लेख)

माणसाचे मशीन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कादंबरीविश्व (लेख)